Amravati Municipal Corporation
अमरावती : अमरावती महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत आवश्यक आहे. मात्र, भाजपने रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाची साथ घेतल्यास राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार संजय खोडके यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपसमोर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत २५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र सत्तास्थापनेसाठी भाजपला आणखी २० नगरसेवकांची गरज लागणार आहे. महायुतीची सत्ता स्थापन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच सत्तास्थापनेचा मार्ग सरळ नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीचा घटक पक्ष असला, तरी पक्षाने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली. ८७ जागा लढविणा-या राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या. आता महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी भाजपला राष्ट्रवादीची देखील मदत घ्यावी लागणार आहे. मात्र, भाजप रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेणार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी घेतल्याने नवा पेच भाजपसमोर निर्माण झाला आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. मतदारांनी दिलेला ‘कौल’ आता स्पष्ट झाला असून, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे ८७ सदस्यीय सभागृहात सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा गाठण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
निवडणूक निकालानुसार भाजपाला २५, काँग्रेसला १५, युवा स्वाभिमान पक्षाला १५, एआयएमआयएमला १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ११, शिवसेना (शिंदे गट) ३, बसपाला ३, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला २ आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा मिळाली आहे. त्यामुळे कोणताही पक्ष बहुमताच्या जवळपासही नाही.
भाजपाकडून महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचा पहिला पर्याय तपासला जात आहे. भाजप, युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदे गट एकत्र आल्यास बहुमताच्या सदस्यांचा आकडा सहज गाठता येऊ शकतो. मात्र, अमरावती राष्ट्रवादीचे नेते आ. संजय खोडके यांनी युवा स्वाभिमान पक्षासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे हा पर्याय अडचणीत आला आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीला वगळून भाजप, युवा स्वाभिमान आणि शिंदे गट मिळून ४४ सदस्यांचा काठावरचा बहुमताचा आकडा तयार होतो.
दुसरीकडे काँग्रेसही भाजप व युवा स्वाभिमान पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पर्यायी आघाडीची चाचपणी करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (खोडके गट), एमआयएम, बसपा, शिवसेना (उबाठा) आणि वंचित आघाडी एकत्र आल्यास ४४ सदस्यांचे संख्याबळ तयार होऊ शकते. मात्र, राष्ट्रवादी सध्या राज्यातील महायुती सरकारचा घटक असल्याने हा पर्याय कितपत शक्य आहे, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, केवळ १५ जागा जिंकलेल्या काँग्रेसने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असून भाजप बहुमत जमवण्यात अपयशी ठरते का, याकडे बारकाईने लक्ष ठेवले आहे. आगामी काही दिवसांत अमरावती महापालिकेतील सत्ता समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.