

अमरावती : अमरावती महापालिका निवडणुकीतील पराभवाला विरोधक नव्हे, तर भाजपाच्या वरिष्ठ नेत्या नवनीत राणा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत भाजपाच्या २२ उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (दि.१७) पत्र पाठवून नवनीत राणा यांचे पक्षातून तात्काळ निष्कासन करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पत्रात उमेदवारांनी नमूद केले आहे की, आम्ही भाजपाचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असून समाजाशी घट्ट नाळ जुळवून निवडणूक लढवली. मात्र, नवनीत राणा यांनी भाजपात राहूनच पक्षाविरोधात काम करत आमचा पराभव घडवून आणला. भाजपाचे गढ असलेल्या प्रभागांमध्ये त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे करून संपूर्ण पॅनेल पाडण्याचे नियोजन केले, असा आरोप करण्यात आला आहे.
भाजपाच्या पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो लावण्यासाठी शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या माध्यमातून दबाव टाकण्यात आल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. त्यानंतर अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र वापरून शहरभर संभ्रम निर्माण करण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीदरम्यान निष्क्रिय राहिले, तर शेवटच्या टप्प्यात नवनीत राणा यांनी उघडपणे भाजपाच्या विरोधात प्रचार केला, असा आरोपही पत्रात आहे.
नवनीत राणा यांनी भाजपाचे उमेदवार डमी असून युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असल्याचा प्रचार केला. पैशांची लयलूट, मतदारांवर दबाव, प्रचार रॅली आणि प्रभागनिहाय भाषणे देऊन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. ‘आम्ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राणा दाम्पत्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, त्यांनीच आमच्यावर गद्दारीचा आरोप करून आम्हाला उद्ध्वस्त केले,’ असे उमेदवारांनी नमूद केले.
भाजपचा नायनाट होऊ नये म्हणून....
भविष्यात भाजपाचा अमरावतीत नायनाट होऊ नये, यासाठी नवनीत राणा यांना पक्षातून मुक्त करण्याची कळकळीची विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाला केली आहे. निवेदनावर आशिष अतकारे, अभिजित वानखडे, चेतन गावंडे, ऋषी खत्री, डॉ. वीरेंद्र ढोबळे, नरेश धामाई, सुनंदा खरड, मृणाली चौधरी, चेतन पवार, रोशनी वाकडे, बरखा शर्मा, रिटा मोकळकर, संतोष पिढेकर, गौरव बांते, प्रणित सोनी, योगेश निमकर, राजेश पड्डा साहू, लता देशमुख,स्वाती निस्ताने या २२ उमेदवारांच्या स्वाक्षर्या आहेत. या प्रकरणामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ८७ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत भाजपचे केवळ २५ नगरसेवक निवडून आले आहे. मागील निवडणुकी ही संख्या ४५ होती. तर यावेळेस युवा स्वाभिमान पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले असून मागील वेळेस त्यांची संख्या तीन होती.
राणा दाम्पत्याने राष्ट्रवादीला संपवले होते-
पत्नीला भाजपच्या स्टार प्रचारक दर्शवून भाजप उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम राणा यांनी केले. एखादा पराजय झाला तरी चालेल पण यांच्या नादी लागून पक्ष संपवू नका. तात्काळ नवनीत राणा यांना युवा स्वाभिमान पक्षासाठी मोकळे करा. राणा दाम्पत्याने अशीच राष्ट्रवादी काँग्रेस संपवली होती. राष्ट्रवादीला शहरात पुन्हा पक्ष उभा करायला दहा वर्ष लागली. आमच्या पैकी काही सहकारी विजयी झाले आहेत. पण त्यांना हरवण्यासाठी देखील नवनीत राणा यांनी कसून प्रयत्न केले, असे देवेद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.