Morshi Varud road truck bike collision
अमरावती : मोर्शी ते वरुड मार्गावर भरधाव ट्रकने मोटर सायकल स्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटर सायकल चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना शुकवारी (दि.१९) हिवरखेड फाट्यानजीक सायंकाळी ५ वाजताचे सुमारास घडली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ रूपसा मसराम (वय ३५ रा.जापका ता. प्रभात पट्टन) व त्यांची पत्नी ज्योती बद्रीनाथ मसराम (वय ३०) हे दांपत्य शेंदुरजना बाजार येथून काम आटोपून मोटर सायकल (एम एच ४० जी ५५ ५७) ने आपल्या गावी जापका येथे मोर्शी हिवरखेड मार्गे जात होते.
दरम्यान समोरून वरुड येथून मोर्शीकडे भरधाव वेगाने जाणार्या एलपी ट्रक (एम एच ४० सीडी ३४३४) ने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात मोटर सायकल चालक बद्रीनाथ मसराम यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली. लगेच स्थानिकांनी जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. बद्रीनाथचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील शवागारात ठेवण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त होताच मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नांदगावकर, हवालदार मंगेश श्रीराव, वेदेश्वर पिसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले.पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.