Harshajit Deshmukh  Pudhari
अमरावती

Amravati MLC Election | महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख अचानक रुग्णालयात दाखल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाविकास आघाडीची 'वंचित' सोबत बोलणी?

पुढारी वृत्तसेवा

Maha Vikas Aghadi Candidate Harshajit Deshmukh Hospitalized

अमरावती : अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून महाविकास आघाडीचे अधिकृत काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख हे अचानक गायब झाल्याच्या अफवा आणि चर्चांना अमरावतीच्या राजकीय वर्तुळात उधाण आले होते.

कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी संपर्क होऊ न शकल्याने प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता त्यांना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जूनच्या रात्री हर्षजित देशमुख यांना अचानक तीव्र अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तातडीने अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजते आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली. या मतदारसंघात आगामी १८ जूनरोजी मतदान होणार असून निवडणूक प्रक्रियेला आता केवळ ८ दिवस शिल्लक राहिले आहेत.

निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्यात मुख्य तिरंगी लढत होणार होती. तत्पूर्वी, अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी सर्वोच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने आपली याचिका मागे घेतली. ज्यामुळे ते आधीच या शर्यतीतून बाहेर पडले होते. आता हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल झाल्याने ते प्रत्यक्ष निवडणूक प्रचारापासून दूर राहणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीची 'वंचित' सोबत बोलणी?

हर्षजित देशमुख यांच्या या अचानक आजारपणामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ते भाजप उमेदवाराला 'मॅनेज' झाल्याची दबकी चर्चाही रंगू लागली आहे. ऐन वेळेस उमेदवार मैदानातून बाजूला झाल्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि नेते मोठ्या चिंतेत पडले आहेत.या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांची वंचित बहुजन आघाडीसोबत पडद्यामागे बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.

अमरावतीच्या या जागेवर भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांना जाहीर पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर ही बोलणी यशस्वी झाली, तर ही निवडणूक आता थेट प्रवीण पोटे विरुद्ध निलेश विश्वकर्मा अशी दुहेरी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT