मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी परतवाडा येथील केंद्राला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  Pudhari
अमरावती

Kevalram Kale | चार बळी घेणारी वाघीण मेळघाटात नको: आमदार केवलराम काळे

मेळघाटात आधीपासूनच मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू

पुढारी वृत्तसेवा

Melghat Tiger Reserve

अमरावती : चंद्रपूर जिल्ह्यात चार महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. या वाघिणीला भविष्यात मेळघाटातील अतिसंरक्षित क्षेत्रात सोडण्याची वन्यजीव विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळताच, मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मंगळवारी (दि. २) परतवाडा येथील केंद्राला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मेळघाटात आधीपासूनच मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू असून यापूर्वी बिबट्याने अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत चंद्रपूरची नरभक्षक वाघीण मेळघाटात सोडल्यास हा संघर्ष आणखी तीव्र होईल, अशी भीती व्यक्त करत त्यांनी या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला.

या वाघिणीचे चार बछडे असून त्यापैकी दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन्यजीव विभागाला यश आले आहे. त्यातील एका बछड्याला चंद्रपूर येथील वनकुटीत तर दुसऱ्याला नागपूरच्या गोरेवाडा येथे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परतवाडा येथे असलेल्या या वाघिणीला ज्ञानगंगा वन्यजीव भागात किंवा नागपूरच्या गोरेवाडा येथे सोडण्यात यावे, जेणेकरून या बछड्यांना त्यांच्या आईचा सहवास मिळू शकेल, अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे.

याप्रसंगी यशवंत काळे, शैलेश म्हाला, वन्यजीव अभ्यासक अल्केश ठाकरे आणि स्वीय सहाय्यक आकाश खैरकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT