अमरावती मध्ये पतीने पत्नीच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली.  File Photo
अमरावती

अमरावती : कौटुंबिक वादातून पतीने फेकले पत्नीच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड

Amaravati Acid Attack | आरोपी पतीला अटक

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : कौटुंबिक कलह आणि पैशांच्या वादातून पतीने पत्नीच्या चेह-यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना शहरातील अकोली रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि.६) घडली. या प्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी पती शुभम भास्कर आंधळे (वय २६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेत पत्नी १३% जळाल्याची माहिती आहे. सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिचे पहिले लग्न २०१२ मध्ये झाले होते. अमरावती येथे राहत असताना ती एका ज्वेलर्सच्या दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करते. यादरम्यान तिची शुभम आंधळे याच्याशी ३ वर्षांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर त्याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले आणि शुभम आंधळेशी लग्न झाले. मात्र लग्न झाल्यापासून शुभम आंधळेला तिच्या चारित्र्यावर संशय असायचा. याशिवाय पैशाची मागणी करून तो नेहमी तिच्याशी भांडण करीत होता. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता शुभम आंधळे हा नेहमीप्रमाणे तिला ज्वेलर्सच्या दुकानातून घरी नेण्यासाठी आला आणि त्यानंतर दोघेही दुचाकीवरून घराकडे निघाले. यावेळी शुभम आंधळे याने साई नगरजवळील एका दुकानात वाहन थांबवून काही खरेदी करून खिशात ठेवले. त्यानंतर घरी आल्यावर शुभमने पत्नीला ३५०० रुपये मागितले असता तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी भांडण व धक्काबुक्की सुरू केली. या दरम्यान तिचा मोबाईल जमिनीवर पडला आणि फुटला. त्यामुळे पत्नीने चिडून शुभमच्या दुचाकीवर दगड फेकून हेडलाइट तोडली.

यादरम्यान दुचाकी खाली पडली. यावेळी पत्नी घरात जात असताना शुभमने तिला मध्येच पकडले आणि खिशातून बाटली काढून त्यात भरलेले ऍसिड तिच्या चेहर्‍यावर फेकले. त्यामुळे पत्नीच्या चेहर्‍यावर, डोळ्यात आणि घशात जळजळ होऊ लागली. तिने तत्काळ बाथरूममध्ये जाऊन तोंडावर व मानेवर पाणी मारले. ओरडण्याचा आवाज ऐकून ऐकून शेजारी तेथे आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि तिला तात्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. महिलेने दिलेल्या जबानी तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुभम आंधळे याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT