Rajhans Milk Agency
अमरावती : दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान (दि.२५) इतवारा बाजार परिसरातील राजहंस दूध एजन्सीमध्ये साठवणुकीतील त्रुटी आढळून आल्याने १८६ लिटर दूध नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत ११ हजार ५३२ रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. याप्रकरणी संबंधित एजन्सीला नोटीस बजावण्यात आली असून, परवाना निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत इतवारा बाजार परिसरातील राजहंस दूध एजन्सीमध्ये पहाटे ४.३० वाजता दूध आणण्यात आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत हे दूध शीतगृहात ठेवण्यात आले नव्हते. त्यातच एजन्सीमधील कोल्ड फ्रीजरही नादुरुस्त अवस्थेत आढळला. दूध बराच वेळ योग्य तापमानात साठवले नसल्याने त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन ते खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १८६ लिटर दूध अर्थात ३७६ पाकिटे नष्ट करण्यात आली.
सणासुदीच्या काळात दूध, पनीर, खवा आणि मिठाईसह विविध खाद्यपदार्थांची मागणी वाढते. या काळात निकृष्ट किंवा असुरक्षित खाद्यपदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी शहरासह ग्रामीण भागातील डेअरी, मिठाईची दुकाने आणि अन्य खाद्य प्रतिष्ठानांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे आणि अदिती देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.