माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत (सीसीटीव्ही फुटेज सादर केले.  Pudhari
अमरावती

Amravati Dufferin Hospital Fire Case : आगीच्या अलार्म आणि लाल लाईटनंतरही परिचारिका झोपेतच! : डॉ. सुनील देशमुख

पत्रकार परिषदेत केले उघड सीसीटीव्‍ही फुटेज, प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्‍थित केले प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

Amravati Dufferin Hospital NICU Fire Case

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा महिला रुग्णालयातील (डफरीन) नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) घडलेल्या भीषण अग्निकांड प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत (दि.३०) सीसीटीव्ही फुटेज सादर करत रुग्णालयातील निष्काळजीपणा आणि चौकशी अहवालातील प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये काय आढळले?

२४ ऑगस्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आग लागण्यापूर्वी NICU लॉबीत असलेल्या दोन परिचारिका रात्रभर झोपलेल्या दिसत आहेत. आग लागताना ३ ते ४ वेळा अलार्म वाजला आणि लाल लाईट लागला, तरीही त्या परिचारिका तातडीने सक्रिय झाल्या नाहीत. व्हेंटिलेटरमध्ये स्फोटसदृश आवाज झाल्यानंतरच परिचारिकांची झोप उडाली आणि त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेजारच्या कक्षातून इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी धाव घेत अग्निशामक यंत्राचा वापर सुरू केला.

तपास अहवाल 'स्क्रिप्टेड' असल्याचा आरोप

डॉ. सुनील देशमुख यांनी असा दावा केला आहे की, प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेजमधील घटनाक्रम आणि प्रशासनाने तयार केलेला तपास अहवाल यात मोठा फरक आहे. दोषींना वाचवण्यासाठी तपास अहवाल आधीच (ठरवून) 'स्क्रिप्टेड' तयार केला गेला असून संपूर्ण चौकशीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अग्निशमन दलाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह

घटनेच्या दिवशी पहाटे २.५० वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली होती, परंतु अग्निशामक दलाच्या गाड्या तब्बल ३.३० वाजता (सुमारे ४० मिनिटांनी) पोहोचल्या. या वेळेतील फरकाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रुग्णालयातील इलेक्ट्रिकल व फायर सेफ्टीच्‍या कामावर प्रश्‍नचिन्‍ह

रुग्णालयातील इलेक्ट्रिकल व फायर सेफ्टीचे काम मूळ कंत्राटदाराने इतर एजन्सींना सब-कॉन्ट्रॅक्ट देऊन करवून घेतले होते का? फायर सेफ्टी NOC कोणत्या निकषांवर दिली गेली? याची सखोल चौकशी करून संपूर्ण प्रणालीचे टेक्निकल ऑडिट करण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विश्वासातील ठेकेदाराला वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जात असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT