

अमरावती : शहरातील सराफांची तीन दुकाने फोडून सोने-चांदी लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अमरावती शहर गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपींना अकोला-अमरावती मार्गावर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४ किलो चांदी, ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व लगड, रोख रक्कम, मोटारसायकल आणि घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोशनसिंग बबलू सिंग टाक (वय २४, रा. संजयनगर, देऊळगाव राजा), हरिंदरसिंग संतोषसिंग दुधाणी (वय २४, रा. शेंदला, ता. मेहकर) आणि गणेश जनार्दन मानवतकर (वय ३२, रा. शेंदला, ता. मेहकर, जि. बुलढाणा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. ११ सप्टेंबर रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफाचे दुकान फोडून सोने-चांदी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडून सुरू असताना फ्रेजरपुरा आणि राजापेठ हद्दीतही अशाच पद्धतीने सराफांची दुकाने फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिन्ही घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग असल्याचा संशय बळावल्याने दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
आरोपींचा माग काढताना पोलिसांनी सुमारे २०० ते २५० किलोमीटर परिसरातील ३०० ते ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून संशयितांच्या हालचाली आणि त्यांच्या वापरातील वाहनाबाबत माहिती मिळाली. आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत घरफोड्ये असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, अकोला तसेच गुजरातमधील सुरत येथे आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यांच्या संभाव्य ठावठिकाण्यांवर गोपनीय बातमीदारांचे जाळेही सक्रिय करण्यात आले.
२३ सप्टेंबर रोजी गणेश मानवतकर हा दोन साथीदारांसह चोरीचा मुद्देमाल व घरफोडीचे साहित्य घेऊन मोटारसायकलने अकोल्याहून नागपूरच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तांत्रिक माहितीच्या आधारे खात्री करून पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने राममेघे कॉलेजजवळील जंगल परिसरात दोन पथकांच्या मदतीने सापळा रचला. काही वेळाने काळ्या रंगाच्या कॉलेज बॅगा पाठीवर घेतलेले तीन जण मोटारसायकलवरून येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता बॅगेत कटर, टामी, कात्री, पेचकस, विग, टॉर्च आदी घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले.
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी अमरावती शहरातील गाडगेनगर, फ्रेजरपुरा आणि राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफा दुकाने फोडल्याची कबुली दिली. तसेच एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचाही उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
जप्त मुद्देमालात ४ किलो चांदी (१० लाख रुपये), १० ग्रॅम सोन्याची लगड (१.५० लाख), २५ ग्रॅम सोन्याचे बेसर (३.७५ लाख), हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (६० हजार), १० हजारांची रोख रक्कम आणि घरफोडीचे साहित्य (२० हजार) यांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींवर बुलढाणा, वाशिम, अकोला आणि लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी तसेच इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
ही कारवाई अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, उपायुक्त (मुख्यालय व गुन्हे) प्रांजली सोनवणे आणि सहायक पोलीस आयुक्त नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर व दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.