लवादा गावाजवळील अलई नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट दरीत कोसळला Pudhari
अमरावती

Amravati Accident | धारणी-परतवाडा मार्गावर पिकअप दरीत कोसळून २ मजूर महिला ठार, ६ जखमी

लवादा गावाजवळील अलई नदीच्या पुलावर भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Dharni Paratwada road mishap

अमरावती : धारणी-परतवाडा मार्गावर मजुरांना घेऊन जाणार्‍या पिकअप व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) घडली. या अपघातात दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले. लवादा गावाजवळील अलई नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट दरीत कोसळल्याने ही घटना घडली.

समाय चुनीलाल सावलकर (वय ४०) आणि मालती मिठाराम भिलावेकर (वय १८, दोघी रा. लवादा ) असे मृत महिला मजुरांची नावे आहेत. तर सुष्मिता रामचरण जांभेकर (वय २०), अस्मिता रामेश्वर जांभेकर (वय १६), ममता राजेश्वर कासदेकर (वय २६) यांच्यासह इतर मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

माहितीनुसार, लवादा गावातील सर्व मजूर मंगळवारी सकाळी टरबूज आणि खरबूज तोडणीच्या कामासाठी जात होते. सकाळी ते घरून निघाले होते. लवादा गावाजवळ अलई नदीच्या पुलावर चालकाचे पिकअप वरून नियंत्रण सुटले आणि त्यामुळे वाहन दरीत कोसळले. यात समाया सावलकर आणि मालती भिलावेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ मजूर जखमी आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मार्गावर वारंवार होणार्‍या अपघातांमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, ओव्हरलोडिंग किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT