Dharni Paratwada highway accident
अमरावती: धारणी–परतवाडा मार्गावर घटांग परिसरात खासगी ट्रॅव्हल्स आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची गुरुवारी (दि.१) समोरासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, दोन्ही बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच-२७ सी-४४८०) ही प्रवाशांना घेऊन धारणीच्या दिशेने जात होती. त्याच वेळी समोरून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने (क्रमांक एमएच-२७ बीके-५४३२) एसटी बसला जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी दोन्ही वाहनांत प्रवासी होते.
या धडकेत दोन्ही बस चालकांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर काही काळासाठी धारणी–परतवाडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हा अपघात घटांग ते बिहाली गावादरम्यान घडला.
या मार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मेळघाट ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती, वेगमर्यादा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.