Pregnant woman attacked with knife
अमरावती : गर्भवती पत्नीला बाहेर जेवणाकरिता नेण्याचा बहाणा करत पतीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.११) दुपारी पोहरा मार्गावरील बोडणा फाट्यावर घडली. पुजा राहुल तंबोले (वय ३०, रा. समाधाननगर, अमरावती) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पती राहुल प्रकाश तंबोले (वय ३१) व त्याचा मित्र पियुष हर्षे (रा.नमुना गल्ली) या दोघांना या प्रकरणी अटक केली.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी पुजा तंबोले ही सहा महिन्याची गर्भवती आहे. ती रविवारी घरी होती. दरम्यान दुपारच्या सुमारास तिचा पती राहुल याने तिला बाहेर जेवणासाठी जाण्याचा आग्रह धरला. त्यानंतर राहुलने आपल्या एका मित्राला सोबत घेत तिला पोहरा रोडवरील बोडणा फाट्यावर नेले आणि अचानक राहुलने पत्नी पुजावर चाकूने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यात पुजा ही गंभीर जखमी झाली.
या प्राणघातक हल्ल्यानंतर राहुल व त्याचा मित्र तेथून पळून गेले. पुजाला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच सोडले होते. दरम्यान रस्त्यावरून ये-जा करणा-या नागरिकांना महिला जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर माहितीवरून पोलिसानी तत्काळ घटनास्थळ गाठले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव हे सुध्दा घटनास्थळी पोहोचले. जखमी महिलेला रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. जखमी पुजाला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यावर तिचे पोलिसांनी जबाब नोंदविले. त्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी पती प्रकाश तंबोलेची चौकशी केली असता, त्याने पोलिसांची दिशाभुल केली. मात्र पोलिसांनी हिसका दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मित्र हर्ष यालाही अटक केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुजा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथील रूग्णालयात हलविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते.पुढील तपास पोलिस करत आहेत.