Woman abducted at knifepoint
अमरावती : एका २२ वर्षीय विवाहित महिलेचे चाकूचा धाक दाखवून अपहरण करून तिच्यावर बारा ते तेरा दिवस बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीत हा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.
या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी फैजान खान अन्नु खान (वय २९, रा. अन्सार नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान खान हा पीडितेच्या पतीचा मित्र आहे. १० मे रोजी सकाळी १० वाजता तो पीडितेच्या घरी आला. त्याने धारदार चाकूचा धाक दाखवत बळजबरीने महिलेवर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली.
त्याच रात्री त्याने पुन्हा तिच्या घरी येऊन तिला सोबत यायला सांगितले. पीडितेने नकार दिल्यावर त्याने पुन्हा तिच्या मुलांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती ११ मे रोजी सकाळी १० वाजता फैजान खानसोबत बाहेर गेली. फैजान तिला हैदराबादला घेऊन गेला आणि बारा ते तेरा दिवस तिला बंधक बनवून तिच्यावर रोज बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडिता त्याच्या तावडीतून सुटून घरी परतली. महिलेने नागपुरी गेट पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी फैजान खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.