Amravati Contractor Death Pudhari
अमरावती

Amravati Contractor Death: 'घनश्याम, मला माफ कर…', मृत्यूपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं? अमरावतीतील कंत्राटदाराच्या मृत्यूने खळबळ

Amravati Contractor Death: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरूड येथील शासकीय कंत्राटदार सुनील वागद्रे यांच्या जाण्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Rahul Shelke

Amravati Contractor Death: राज्यातील शासकीय कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरूड येथील शासकीय कंत्राटदार सुनील वागद्रे यांनी जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही आता समोर आली असून, त्यातील मजकुरामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शासकीय कामांची जवळपास अडीच कोटी रुपयांची देयके थकल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप करण्यात येत आहे.

मृत्यूपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं?

सुनील वागद्रे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या कुटुंबीयांचा उल्लेख केला आहे. त्यांनी घनश्याम याची माफी मागितली असून, पुढे कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचे आवाहन केले आहे. लहान भाऊ-बहिणींचे शिक्षण पूर्ण करणे, तसेच घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे याची जबाबदारी त्यांनी घनश्यामवर सोपवल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.

''घनश्याम मला माफ कर. तुला पुढे सगळं सांभाळायचं आहे... तुझे लहान भाऊ बहिणीचे शिक्षण पूर्ण करणे आहे. तू त्यांचा मोठा भाऊ आहेस. तूच आता त्यांची आणि काकूची देखभाल करणार आहे.''

अडीच कोटींच्या थकीत बिलांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील वागद्रे यांच्या शासकीय कामांची देयके बराच काळ प्रलंबित होती. जवळपास अडीच कोटी रुपयांची बिले मिळाली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढल्याचे सांगितले जाते. या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

बँकेची कर्जे आणि आर्थिक व्यवहारांचा उल्लेख

मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत वागद्रे यांनी काही आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला आहे. काही व्यक्तींच्या नावावर असलेली बिले मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याबाबत त्यांनी लिहिले आहे. तसेच, बागेची देखभाल करणे, बाग विकून उत्क्रांती बँकेचे कर्ज फेडणे आणि खामगाव बँकेतील सोन्याच्या कर्जाबाबत लक्ष देण्यास सांगितले आहे.

याशिवाय, कुटुंबातील सदस्यांनी आर्थिक व्यवहार आणि कर्जांची जबाबदारी सांभाळावी, असा आशयही चिठ्ठीत असल्याचे समोर आले आहे.

'माझ्या निर्णयामागे कोणीही जबाबदार नाही'

चिठ्ठीतील एका महत्त्वाच्या मजकुरात वागद्रे यांनी आपल्या निर्णयामागे कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे.

या चिठ्ठीतील मजकूर आणि थकीत बिलांबाबतचे आरोप यामुळे शासकीय कंत्राटदारांच्या देयकांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सुनील वागद्रे यांच्या मृत्यूमुळे जरूड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शासकीय कामांची बिले वेळेत न मिळण्याच्या प्रश्नावरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT