अमरावती : शहरात गाजत असलेल्या बाळ विक्री प्रकरणाचा तपास आता अमरावती जिल्ह्याबाहेर पोहोचला असून फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी (दि. १८) वर्धा जिल्ह्यातून आणखी एका बाळाला सुखरूप ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने (वय ४९) हिने पोलीस चौकशीत एकूण सहा बालकांची बेकायदेशीर देवाण-घेवाण झाल्याची माहिती दिली आहे. आतापर्यंत दोन बालके पोलिसांच्या हाती लागली असून उर्वरित चार बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
अमरावतीत राजापेठ परिसरातील भोजने मॅटर्निटी हॉस्पिटलमधून बाळांची विक्री होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत डॉ. वैशाली भोजने आणि तिचा पती प्रफुल्ल वसंतराव भोजने (वय ५६, दोघे रा. बुटी प्लॉट, राजापेठ) यांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीत २० नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान डॉ. वैशाली भोजने हिने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता सहा बालकांची देवाण-घेवाण झाल्याचे सांगितले. त्यानुसार तपास पथकाने वर्धा जिल्ह्यात जाऊन एका दाम्पत्याकडे एक वर्षापूर्वी दिलेले बाळ ताब्यात घेतले आणि अमरावतीला आणले. यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजी एका बालकाला ताब्यात घेण्यात आले होते. एक वर्षीय बाळाला बाल कल्याण समितीसमोर हजर केल्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असून त्याच्या खर्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे.
गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची बाळे घेतली जात होती आणि ती निपुत्रिक दाम्पत्यांना मोठ्या रकमेत दिली जात होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात घरोघरी व रुग्णालयांत जाऊन रक्ताचे नमुने गोळा करणार्या निर्मल हिम्मतराव सरदार (वय ५०, रा. मंगलधाम, अमरावती) याला १७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत या प्रकरणात डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने, डॉ. मयूर धांडगे, निर्मल सरदार यांना अटक करण्यात आली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, मध्यस्थांची साखळी आणि उर्वरित चार बालकांचा कसून शोध घेत आहेत.