Census Staff Alertness
अमरावती : जनगणनेचे काम करत असताना प्रगणकांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याची घटना (दि.२५) अमरावतीत वार्ड क्रमांक १९, सर्कल क्रमांक ३, ब्लॉक क्रमांक १५ येथे समोर आली आहे.
जनगणनेचे काम सुरू असताना ब्लॉक क्रमांक १५ च्या प्रगणक वैशाली प्रशांत नालसे या आपल्या कार्यासाठी संबंधित घरात पोहोचल्या. त्यांच्यासोबत ब्लॉक क्रमांक १६ चे प्रगणक मनोज नेताजी वाकोडे तसेच सुपरवायझर केशव नरेंद्र पंचारिया हेही उपस्थित होते. घराचा दरवाजा ठोठावून व आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
शेजार्यांकडे चौकशी केली असता, त्या घरात वृद्ध आजी-आजोबा दोघेच राहत असून आजोबांची तब्येत नेहमीच खराब असते व आजी रोज सकाळी फिरायला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुरुवातीला ते बाहेर गेले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मात्र, प्रगणकांना घरातील लाईट व पंखे सुरू असल्याचे दिसून आले. संशय आल्याने त्यांनी घरात डोकावून पाहिले असता वृद्ध आजोबा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्या शेजारी आजीही बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या. घरातून दुर्गंधीही येत होती.
यावेळी प्रगणकांनी तत्काळ शेजार्यांना बोलावून घेतले तसेच जवळ राहणार्या डॉक्टरांनाही घटनास्थळी पाचारण केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता आजोबांचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पाहून वृद्ध आजी बेशुद्ध पडल्या होत्या.
त्यानंतर संबंधित महिलेला तातडीने रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, महिलेची ऑक्सिजन लेव्हल व शरीरातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली होती. थोडा जरी उशीर झाला असता तर त्यांचाही मृत्यू झाला असता, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित वृद्ध दाम्पत्याचा एक मुलगा परदेशात राहतो, तर दुसरा नागपुरात वास्तव्यास आहे. या घटनेची माहिती दोन्ही मुलांना देण्यात आली. तसेच मृत वृद्धाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
जनगणना कर्मचार्यांच्या सतर्कता, तत्परता आणि मानवतेच्या भावनेमुळे एका महिलेचा जीव वाचल्याने परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.