Amravati News | वरुड तालुक्यात हृदयद्रावक दुर्घटना : पुसली धरणात तीन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू 

घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ
Aksa Beach drowning
वरुड तालुक्यात हृदयद्रावक दुर्घटना : पुसली धरणात तीन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू File Photo
Published on
Updated on

अमरावती : उन्हाळ्याच्या सुट्टीत आई-वडिलांकडे आलेल्या तीन निष्पाप चिमुकल्यांचा पुसली धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना वरुड तालुक्यातील सातनूर गावाजवळ रविवारी (दि.१८) उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून उईके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतुलाल उईके हे सातनूर शिवारातील मनोहर निमकर यांच्या शेतात रखवालदार म्हणून कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांची तीन मुले पंकज संतुलाल उईके (वय १०), प्रिया संतुलाल उईके (वय ८) आणि पवन संतुलाल उईके (वय ७) ही नरखेड येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे ती आई-वडिलांकडे सातनूर येथे आली होती. 

१७ मे रोजी सकाळपासून ही तिन्ही भावंड अचानक बेपत्ता झाली होती. संध्याकाळपर्यंत मुले घरी न परतल्याने संतुलाल उईके यांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र, मुलांचा कोणताही मागमूस लागत नव्हता. अखेर रविवारी दुपारी एकच्या सुमारास सातनूर गावालगतच्या पुसली धरणाजवळ मुलांचे कपडे आढळून आले. त्यानंतर धरणात शोध घेतला असता तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. ही माहिती मिळताच शेघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक अंदाजानुसार, ही तिन्ही मुले धरणात अंघोळीसाठी गेली असावीत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. एकाच कुटुंबातील तीन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याने सातनूर गावासह संपूर्ण वरुड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. उईके कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या प्रकरणाचा पुढील तपास शेघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगेश शेगोकार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news