Badnera Newborn Baby Death
अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालीमाता नगरात एका नवजात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला होता. शवविच्छेदन अहवालानंतर त्या बालिकेला उन्हात झोपविल्याने जीव गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणात बडनेरा पोलीसांनी (दि.२३) आरोपी आई-वडिलांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये सूरज महेंद्रसिंग गुजर (वय ४५) आणि एक महिला (वय ४०, दोघेही रा. सावता मैदान, जुनी वस्ती, बडनेरा) यांचा समावेश आहे.
अमरावतीत साईनगरजवळील खंडेलवाल यांच्या जागेतील कालीमाता नगरात नवजात बालिकेच्या मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली होती. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी परिसरातील शेतशिवारात खड्डा खोदून मृतदेह पुरल्याची माहिती पुढे आली.
ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बडनेरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. मात्र तपासानंतर धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज महेंद्रसिंग गुजर (वय ४५) आणि एक महिला (वय ४०), दोघेही रा. सावता मैदान, जुनी वस्ती, बडनेरा यांनी पाच दिवसांच्या नवजात बालिकेला भर उन्हात उघड्यावर ठेवून तिच्या देखभाल व संगोपनात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. अशक्त अवस्थेतील या बालिकेचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय निष्कर्ष डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे पोलीसांनी आता या प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे.