Amravati Municipal Election Result Vivek Kaloti Defeat: अमरावती महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना अमरावतीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या निकालामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून भाजपसाठी ही धक्कादायक बातमी मानली जात आहे.
विवेक कलोती हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष होतं. मात्र मतदारांनी वेगळा निर्णय दिला. त्यांच्याविरोधात झालेल्या लढतीत काँग्रेसने जोरदार बाजी मारली. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे.
अमरावती महापालिकेत एकूण 87 जागा असून सत्तेसाठी 44 जागा मिळवणं आवश्यक आहे. सध्या कोणता पक्ष हा आकडा गाठतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अमरावतीत अनेक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले, तर काहींनी आघाड्या करून मैदान गाजवलं. त्यामुळे निकाल शेवटच्या फेऱ्यांपर्यंत रंगतदार राहण्याची शक्यता आहे.
एकूणच, अमरावतीच्या मतमोजणीत विवेक कलोतींचा पराभव हा आजचा सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा आहे. आता अंतिम निकालात अमरावतीची सत्ता कोणाच्या हाती जाते, हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे.