अमरावती

आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; पाच जखमी

दिनेश चोरगे

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : दर्यापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लखापुर फाट्याजवळ मजुरांच्या ट्रॅक्टरला शुक्रवारी (दि.२२) आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. यामध्ये शेतकरी महंमद खालीक अमजद यांचा मृत्यू झाला तर अन्य पाच मजूर जखमी झाले. यातील दोघेजण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दर्यापूर शहरातील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट मध्ये स्नेहसंमेलनात भेट देण्याकरता माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर या दर्यापूरला आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार बळवंत वानखडे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांचा ताफा दर्यापूरकडे येत असताना आमदार वानखडे यांची गाडी त्यांच्याच मागे ताफ्यामध्ये होती. त्याच वेळी शेतकरी मोहम्मद खालीक हे आपल्या शेतामध्ये कापूस वेचून त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये मजुरांना घेवून दर्यापूरकडे येत होते. यावेळी आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनाने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने आमदार बळवंत वानखडे हे यशोमती ठाकूर यांच्या गाडीत बसलेले होते. आमदार वानखडे यांच्या गाडीत केवळ ड्रायव्हर व त्यांचे स्वीय सहाय्यक होते. या धडकेत आमदार वानखडे यांच्या गाडीचा अक्षरशः चूराडा झाला. या अपघातात ट्रॅक्टरच्या समोर बसलेले शेतकरी मोहम्मद खालिक यांचा जागीच मृत्यू झाला. मजुरांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत शेतकरी मोहम्मद खालीक हे दर्यापूर येथील सेवा सहकारी सोसायटी क्रमांक 6 चे अध्यक्ष आहेत.

घटनास्थळी जखमींना नेण्यासाठी तातडीने शासकीय रुग्णवाहिका बोलावण्यात करण्यात आली होती. काही वेळ मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरळीत केली. अपघातातील जखमींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना तातडीने अमरावती येथे रवाना करण्यात आले. उर्वरित जखमींवर दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT