Accident Pudhari
अमरावती

Amravati accident | कठोरा नाक्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात; चारचाकी-दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर

वारंवार घडणार्‍या अपघातांमुळे कठोरा नाका परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : शहरातील कठोरा नाका परिसर २६ मे रोजी मध्यरात्री भीषण अपघाताने हादरला. भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे गाडगेनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत तरुणांची नावे तेजस दिवाकर माथुरकर (वय २१, रा. मनीपूर कॉलनी, दुर्गामाता मंदिराजवळ, गाडगेनगर) आणि यश ओमप्रकाश कनोजिया (वय २३, रा. हर्षराज कॉलनी, गाडगेनगर) अशी आहेत. दोघेही जिवलग मित्र असून एका दुचाकीवरून प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कठोरा नाक्याजवळ एमएच-२७-बीएक्स-८६८३ क्रमांकाच्या वाहनाने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की तिन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तेजस माथुरकर आणि यश कनोजिया यांचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या दुचाकीवरील निरजंन अविनाश कोकाटे (रा. पोलीस कॉलनी, अर्जुननगर, गाडगेनगर) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी प्रथमेश दिवाकर माथुरकर (रा. शोभानगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी एमएच-२७-बीएक्स-८६८३ क्रमांकाच्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर मृत तरुणांच्या परिसरात शोककळा पसरली असून मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली आहे. वारंवार घडणार्‍या अपघातांमुळे कठोरा नाका परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT