अमरावती,: अचलपूर तालुक्यातील मौजा खैरी (पारधी बेडा) येथे पत्नीच्या चारित्र्यावरून वारंवार वाद निर्माण करणार्या पतीने निर्दयी मारहाण करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना ३ डिसेंबर रोजी रात्री घडली. आरोपी जानराव उर्फ ज्ञान्या भोसले (वय ३५) याला आसेगाव पूर्णा पोलिसांनी पोलीस पाटीलांच्या मदतीने शिताफीने अटक केली आहे.
जानराव भोसले हा पत्नी सबाना जानराव भोसले (वय ३२) हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. त्यामुळे दोघांत नेहमीच वाद, भांडणे होत. आरोपीचा स्वभाव आक्रमक असल्याने मध्यस्थी करायला जाणार्या गावकर्यांनाही तो शिवीगाळ करून धमकावत असे. त्याने सासू-सासर्यांनाही मारहाण करून घराबाहेर काढल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
निर्घृण मारहाण करून खून-
३ डिसेंबर रोजी रात्री अंदाजे १० ते १२ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादात आरोपीने पत्नीवर बांबूच्या काठीने चेहरा, छाती, पाठ, मांडी, पोटरी अशा शरीराच्या विविध भागांवर अमानुष मारहाण केली. मारहाण गंभीर झाल्याने सबाना भोसले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दांपत्याला दोन लहान मुले आहेत.
फरार होण्याच्या तयारीत असताना अटक-
खून करून आरोपी जानराव भोसले सकाळी फरार होण्याच्या तयारीत असताना आसेगाव पोलीस ठाण्याचे पथक आणि पोलीस पाटील धनश्री दीपक काळे यांच्या मदतीने त्याला कौशल्याने पकडण्यात आले. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन, फिंगरप्रिंट तज्ज्ञ यांना पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले.
ही कारवाई अमरावती पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार, आसेगाव पूर्णा सुरज तेलगोटे, पोउपनि सुरज सुसतकर, पोहवा इजहार गणी, नागराज स्वामी, पंकज गांवडे, शोएब देशमुख, संभाजी टिपरे, राहुल चारथळ यांनी केली. आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.