येथे फुटाणे विक्रेत्‍याच्या खूनानंतर नातेवाईंना चक्काजाम आंदोलन केले Pudhari Photo
अमरावती

Amaravati Crime | अमरावतीत रेल्वेतील फुटाणे विक्रेत्याची निर्घृण हत्या

तीन बाल गुन्हेगारांसह चौघेजण ताब्यात-बडनेरात सावता मैदानातील घटना : संतापलेल्या नातेवाईकांनी बडनेरा बस डेपो परिसरात केला चक्काजाम

पुढारी वृत्तसेवा

अमरावती: अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा एकदा खुनाची घटना समोर आली आहे. मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री बडनेरा येथील सावता मैदान परिसरात रेल्वेतील फुटाणे विक्रेता ऋषी राजू खापेकर (२७) याची व्यवसायातील वादातून निर्घृण हत्या करण्यात आली.

या प्रकरणी मुख्य आरोपी शेख तौफिक शेख साकुरसह १३, १४ व १५ वर्ष वयोगटातील तीन बाल गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक ऋषी आणि आरोपी तौफिक हे दोघेही रेल्वे गाड्यांमध्ये चणे–फुटाणे विकण्याचे काम करीत होते. काही दिवसांपूर्वी दोघांत वाद झाल्याने ऋषीवर कलम ३२६ अंतर्गत गुन्हा नोंद झाला होता.

मंगळवारी मध्यरात्री आरोपींनी ऋषीला घराबाहेर बोलावून सावता मैदानात नेले आणि तेथे शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणात तीन महिलांचा सहभाग असल्याची चर्चा असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीयांचा आक्रोश, चक्काजाम आंदोलन-हत्या प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.

संतापलेल्या नातेवाईकांनी बडनेरा बस डेपो परिसरात चक्काजाम करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आरोपी पकडल्या शिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. डीसीपी गणेश शिंदे, पीआय सुनील चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधींनी समजूत घातल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

मृतकाला दहा दिवसांची चिमुकली

सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे मृतक ऋषीच्या घरी दहा दिवसांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या ऋषीने सासरी राहून व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा आक्रोश पाहवत नव्हता.दरम्यान घटनास्थळी भेट देत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णी आदींनी ठाणेदारांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT