Missing news  File Photo
अमरावती

Amravati Police | हरविलेली चिमुकली तीन तासांत आई-वडिलांच्या स्वाधीन: अमरावती पोलिसांची तत्परता

Amravati Latest News | समृद्धी महामार्गावर एकटी फिरत होती चिमुकली

पुढारी वृत्तसेवा

Missing Girl Found

अमरावती : समृद्धी महामार्गावर हरविलेल्या तीन वर्षीय चिमुकलीला केवळ तीन तासांत तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करून पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली. स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण व मंगरुळ चवाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून ही यशस्वी कार्यवाही पार पडली.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील शुकुलपुर गडवारीपुर येथील समीर शब्बीर हे नागपूरकडे जात असताना (दि.६) समृद्धी महामार्गावर त्यांना एक लहान मुलगी एकटीच फिरताना दिसली. ती बोलू शकत नव्हती, म्हणून त्यांनी तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने मंगरुळ चवाळा पोलीस स्टेशनमध्ये आणले. महिला पोलिसांच्या मदतीने मुलीची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती तिचे नाव, गाव किंवा पालकांची माहिती सांगू शकत नव्हती.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू करण्यात आली. मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. टोलनाक्यांवर जाऊन स्टाफला फोटो दाखवण्यात आला. तिच्या वेशभूषेवरून पारधी, बंजारा समाजातील लोकांमध्येही चौकशी करण्यात आली. शोधमोहीम दरम्यान शिवणी टोलनाक्यावर एक व्यक्ती मुलीबाबत विचारपूस करताना आढळला. त्याच्याशी संपर्क साधून विचारपूस केली असता, तो तिचा वडील असल्याचे स्पष्ट झाले.

शुभम पवार (चव्हाण) व राधिका पवार (चव्हाण), रा. सुदर्शन नगर, जि. वर्धा हे मुलीचे पालक असून, ते संभाजीनगरहून वर्धाकडे जात असताना वाशरूमसाठी थांबले होते. गाडीत गर्दी असल्याने मुलगी खाली उतरल्याचे लक्षात न येता ते पुढे निघून गेले. वर्धा येथे पोहोचल्यावर मुलगी गाडीत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शोध सुरू केला. पोलीसांनी तत्परतेने शोध घेऊन मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. या कामगिरीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अभिजित ठाकरे व छाया मुकाडे यांचे सहकार्य लाभले.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजीव हाके, पोलिस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, विलास सोळंके, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, संजय रायबोले, उमेश धंदर, मंगेश लकडे, विशाल गवळी, सचिन मसांगे, नितीन मुर्तेरकर, सदाशिव देवकते, जितेश राठोड, दिनेश कनोजिया, नम्रता वानखडे, अस्मिता जाधव, चालक रवि राठोड व संजय गेठे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT