Badnera railway station gold theft
अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानकावर एका सराफा व्यापार्याचे ट्रेनमधून २.८९ किलो सोन्याचे दागिने (२ कोटी ११ लाख रुपये) लंपास करण्यात आले. घटनेची माहिती व्यापार्याने बडनेरा जीआरपी पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खान्देश येथील सराफा व्यापारी किशोर वर्मा दिवाळी निमित्त रविवारी अमरावती शहरात वेगवेगळ्या डिजाईनचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आणि ऑर्डर घेण्यासाठी आले होते. रविवारी दिवसभर त्यांनी दागिने दाखवून ऑर्डर घेतल्या. काम झाल्यावर सायंकाळी सहा वाजता ते हावडा मुंबई मेलने जळगाव येथे जाण्यासाठी बडनेरा स्थानकावर आले होते. स्थानकावर आल्यानंतर ते ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये चढले. त्यांनी वरती आपली बॅग ठेवली आणि ते गेट जवळ आले. त्यावेळी त्यांची दागिण्यांनी भरलेली निळ्या रंगाची बॅग अज्ञात आरोपीने लंपास केली.
या बॅगमध्ये २ किलो ८९ ग्रॅम असे २ कोटी ११ लाख रुपयांचे दागिने होते. बॅग नसल्याचे लक्षात येताच किशोर वर्मा यांनी तात्काळ जीआरपीएफ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पूर्ण डब्याची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. पोलिसांनी बडनेरा स्थानक परिसरातील आणि बाहेरील फुटेज तपासले, पण पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
माहितीनुसार किशोर वर्मा रविवारी सकाळी जळगाव वरून दागिने घेऊन अमरावतीत आले होते. दिवसभर त्यांनी व्यापार्यांना दागिने दाखवले आणि सायंकाळी ऑर्डर घेऊन ते परत जात होते. त्यावेळी ही घटना घडली. म्हणजे आरोपी दिवसभर त्यांच्या मागावर असावे आणि त्यांनी संधी मिळताच दागिने भरलेली बॅग लंपास केली असावी, असा अंदाज आहे.