अमरावती : तिवसा-नेरपिंगळाई मार्गावर राजूरवाडी वळणाजवळ रविवारी (दि. 27) एका कारचे नियंत्रण सुटल्याने ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून चालकासह एक तरुण थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नागपूर येथील कुळकर्णी लेआउटमधून सचिन रवींद्रकुमार अवस्थी (वय 36) हे आपल्या मित्रासह चिखलदऱ्याकडे निघाले होते. तळेगाव व तिवसा मार्गे प्रवास करत असताना राजूरवाडी टर्निंगजवळ समोरून येणाऱ्या वाहनाचे हेडलाईट डोळ्यात पडल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी कार खोल खड्यात जाऊन उलटली. सुदैवाने दोघेही किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली.
याच टर्निगजवळ मंगळवारी नागपूरच्या तरुणांची कार कोसळली होती. त्यानंतर एक ट्रकसुद्धा पलटी झाला होता. या वळणावर अपघात टाळण्यासाठी चेतावणी फलक लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अपघाताची माहिती मिळताच, शिरखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शिरखेड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.