Amravati Earthquake
अमरावती : जिल्ह्यातील काही गावांमध्ये बुधवारी (दि.४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र धारणी तालुक्यात शिवझिरी होते. मेळघाटातील धारणी तालुक्यातील सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू या गावांच्या परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र नागरी वस्तीत याचा काहीच परिणाम जाणवला नाही.
बुधवारी रात्री ९.५८ वाजता ३.८ रिश्टर स्केलचा सौम्य स्वरुपाचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रात (एनसीएस) झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत धारणी तहसीलदारांना माहिती दिली. संबंधित गावांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी यांना पाठविण्याच्या सूचना केल्या. तहसीलदार शेवाळे यांनी या गावांमधील काही नागरिकांशी संपर्क केला असता, कुठल्याही स्वरुपाचा धक्का जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सप्टेंबर २०२४ मध्ये अमरावती जिल्ह्यात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू चिखलदरा तालुक्यातील अमझरी- टेटू गावांच्या दरम्यान होता.
दरम्यान, बुधवारी झालेला भूकंप हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील भागांमध्ये झाला. अमरावतीसह अकोला आणि बुलढाणा तसेच मेळघाट सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणावरील भूकंपमापक यंत्र अनेक वर्षांपासून बंद आहे. या यंत्राची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नसल्याचे माहितीदेखील समोर आली आहे.