

अमरावती : आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शुभांगी नीलेश तायवाडे (वय ३२, रा. तपोवन,अमरावती) यांनी रविवारी (दि.२५) सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी शुभांगीच्या पतीसह सासू आणि नणंदेला अटक केली आहे.
शुभांगी या धामणगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी जीवन संपविल्याची तक्रार शुभांगीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पती निलेश, सासू, नणंद व दिरासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पती, सासू आणि नणंदेला अटक केली. सोमवारी तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सखोल चौकशी करीत आहेत.