Girl Ends Life Due to Harassment
अमरावती : गाडगेनगर परिसरातील दहावीत शिकणार्या १५ वर्षीय मुलीने २४ जुलै रोजी राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणाला गजाआड केले आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अभिषेक उर्फ गोलू जनार्धन पवार (रा. रमाबाई आंबेडकरनगर, अमरावती) असे आहे.
मुलीच्या नातेवाइकांचा आरोप आहे की, अभिषेक पवार मागील काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता आणि तिला सतत बोलायला भाग पाडत होता. त्यामुळे ती तणावात होती. त्याच त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवले.
घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सायंकाळी मुलीचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून, पोलिसांनी अभिषेक पवारविरोधात जीवन संपवणेस प्रवृत्त करणे, अॅट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यावर एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.