अमरावती,पुढारी वृत्तसेवा : पशुऔषधी विक्रेता उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात 3 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी शहिम अहमद फिरोज अहमद याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी (दि.21) एनआयएच्या मुंबई येथील विशेष न्यायालयात आत्मसमर्पण करण्यापूर्वीच अटक केली. त्याला गुरूवारी एनआयएच्या मुंबई न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पशुऔषधी विक्रेता उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या केल्यानंतर आरोपी शहीम अहमद हा फरार झाला होता. या हत्याकांड प्रकरणात घटनेच्या वेळी शहीम अहमद अन्य आरोपींसोबत उपस्थित असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तब्बल 3 महिन्यांपासून एनआयएचे पथक त्याचा शोध घेत होते. 13 सप्टेंबरला एनआयएने फरार आरोपी शहीम अहमद याची माहिती देणा-यास 2 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. बुधवार 21 सप्टेंबरला आरोपी शहीम अहमद त्याचे वकील ॲड. राजा अली व ॲड. काशिफ अली यांच्यासह मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात आत्मसमर्पन करण्यासाठी पोहोचला.
दरम्यान, आत्मसमर्पन करण्यापूर्वीच आरोपी शहीम अहमद याला पडताळणीसाठी अधीक्षकांकडे पाठविले. या दरम्यान एनआयएच्या पथकाला माहिती मिळाल्याने त्याला न्यायालय परिसरातच पकडले. एनआयए त्याला ताब्यात घेतले आहे. यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आतापर्यंत 11 आरोपी अटकेत
वादग्रस्त व्यक्तव्य करणा-या भाजपाच्या निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा यांचे समाज माध्यमांमध्ये समर्थन करणारी पोस्ट टाकल्याने पशुऔषधी विक्रेता उमेश कोल्हे यांची 21 जूनच्या रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणात एनआयएने आता पर्यंत एकूण 11 जणांना अटक केली आहे. शहीम अहमद आता पर्यंत कोठे लपला होता. त्याला फरार होण्याची कोणी मदत केली. याची माहिती एनआयए घेत आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याचे संकेत आहे.
हेही वाचा