अमरावती, पुढारी वृत्तसेवा : परतवाडा येथील पांढरी शेतशिवारातील परिसरात रक्ताच्या थारोळ्यात महिला व पुरुषाचे मृतदेह आढळून आल्याने बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी खळबळ उडाली आहे. सुधिर रामदास बोबडे (वय ४८) व एका ४८ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. या दोघांनी आत्महत्या केली? की त्यांची हत्या करण्यात आली? असा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. परतवाडा पोलिस दोन्ही बाजूने तपास करीत आहेत. (Amaravati)
कांडलीतील वनश्री कॉलनीत राहणारा सुधीर बोबडे हा विवाहित होता. त्याला दोन मुले सुध्दा आहेत. त्याचा पानटपरीचा व्यवसाय होता. तर रामनगरातील रहिवासी महिला ही सुध्दा विवाहित असून, तीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ती कपडे शिवण्याची कामे करीत होती. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दोघेही अचानक बेपत्ता झाले होते. दोघांचेही कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. दरम्यान महिलेच्या पतीने परतवाडा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली आहे. (Amaravati)
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी परतवाड्यापासून सात किलो मिटर अंतरावर असणाऱ्या अंजनगांव मार्गावरील पांढरी स्थित रमेश अग्रवाल यांच्या शेतातील एका घरात दोघांचेही मृतदेह आढळून आले आहे. या घटनेच्या माहितीवरून परतवाडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गोहर हसन, ठाणेदार संतोष ताले यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना दोघेही रक्तबंबाळ व मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावर असलेली सुधीर बोबडेची दुचाकी, त्यांच्या हातातील चाकू, दोघांचेही मोबाईल, पर्स व अन्य साहित्य जप्त केली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरिता अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. (Amaravati)
घटनास्थळी सुधीर व महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत भींतीला टेकून होता. महिलेच्या हातात चाकुची मुठ तर चाकुच्या पाते सुधीरच्या हातात असल्याचे दिसून आले. चाकूने वार झाल्यानंतर तडफडून मृत्यू होण्याची शक्यता असते. परंतु त्यासंबधाने कुठलेही निशाण घटनास्थळी आढळून आले नाही. पोलिसांच्या प्राथमिक चौकशी व वस्तुस्थितीनुसार दोघांनाही आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु हत्येचाही संशय व्यक्त होत आहे. (Amaravati)
पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, सुधिरच्या गळ्यावर अनेक वार झाल्याचे आढळून आले, तर महिलेच्या पोटावर व गळ्यावर चाकूने वार केल्याचे आढळून आले. त्यामुळे दोघांनी एकमेकांवर वार करून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. सुधीर व महिला हे दोघेही विवाहित आहे. परंतु त्यांच्यात प्रेमसंबध असल्याची चर्चा गावात सुरु आहे. या प्रेमसंबधातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस या घटनेच्या अनुषंगाने बारकाईने चौकशी व तपास करीत आहेत.
दोन्ही मृतांच्या शरिरावर शस्त्राचे वार आहे. घटनास्थळावर मृताची दुचाकी व अन्य साहित्य सापडले आहे. इतरत्र कुणीही तेथे आल्याच्या खाणाखुनादेखील नाही. त्यामुळे दोघांच्या समंतीने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक दिसून येत आहे.
शशिकांत सातव,
अपर पोलिस अधीक्षक.प्राथमिक माहितीच्या आधारे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक महिला व पुरुषाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे निश्चीत कारण पीएम अहवालानंतर स्पष्ट होईल. पोलिस याप्रकरणाचा बारकाईने तपास करीत आहेत. कौटुंबीक कारणावरून ही घटना घडल्याचा अंदाज आहे.
संतोष टाले,
ठाणेदार, परतवाडा