Akola Farmer Rally
अकोला : शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी याकरिता आज २ मे रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदाना वरुन भव्य ट्रॅक्टर मोर्चा दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान काढण्यात आला. शेतकरी आणि शिवसैनिकांच्या घोषणा, हातातील कर्जमाफीचे फलक आणि शेकडो ट्रॅक्टर या मुळे शहरातील मार्ग दणाणून गेले होते.
महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तसेच विविध शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या पण प्रत्यक्षात मात्र या घोषणा फक्त कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला.
शिवसेना उपनेते आमदार नितीनबापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये शिवसेना उबाठाचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संखेने रखरखत्या उन्हात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर शिवसेना नेत्यांनी यावेळी कर्जमाफी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले.