Akola municipal election
अकोला : राज्यभरात भाजप वगळता कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याची भूमिका पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी स्पष्ट केली होती. मात्र कोणत्याही पक्षाला युतीसाठी डेडलाईन देता येणार नसल्याचेही त्यांनी नुकतेच नमूद केले होते.
मात्र, आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. वंचित यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सोबत जाणार नाही. या घोषणेमुळे अकोल्यात वंचित आणि काँग्रेस यांच्यात युती होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्याने वंचितने ही भूमिका घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, भाजप आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांसाठी युतीचे दरवाजे खुले असल्याचे वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज आपल्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवडणूक रणशिंग फुंकले आहे, यामध्ये काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या प्रभागातून सर्व प्रथम वंचितने उमेदवार जाहीर केले आहे. उमेदवार जाहीर करून वंचितने निवडणुकीचा ‘नारळ फोडत’ थेट मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.