farmer returns rs 21 crop insurance check:
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम पाहून संपूर्ण राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ ३ रुपये, ५ रुपये आणि कमाल २१ रुपये ८५ पैसे इतकी अत्यल्प रक्कम जमा झाली आहे.
मोठ्या नुकसानीच्या तुलनेत मिळालेल्या या नगण्य रकमेला शेतकऱ्यांनी 'आर्थिक थट्टा' असे संबोधले आहे.
"२१ रुपयांत एक किलो साखर सुद्धा येत नाही, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे," अशी संतप्त भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली. या अत्यल्प रकमेमुळे नुकसानभरपाईचा कोणताही दिलासा मिळणार नाही, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
या 'थट्टा' करणाऱ्या मदतीचा निषेध म्हणून अकोल्यातील शेतकऱ्यांनी एक आगळेवेगळे प्रतीकात्मक आंदोलन केले. ज्या शेतकऱ्याच्या खात्यात २१ रुपये ८५ पैसे जमा झाले, त्या शेतकऱ्याने '२१ रुपये ८५ पैसे' इतका रकमेचा चेक लिहून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित विमा कंपनी आणि विभागाला परत पाठवला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना, शासनाकडून अशा प्रकारची तुटपुंजी भरपाई मिळणे अत्यंत लाजिरवाणे आहे. यामुळे शासनाने जाहीर केलेल्या भरपाई पॅकेजवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शेतकऱ्यांनी या अल्परकमेचा तीव्र निषेध करत शासनाकडे तातडीने न्याय्य आणि भरीव नुकसान भरपाई जाहीर करण्याची व ती त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.