Anti Child Abuse Aampaign
अकोला : ॲसेस टु जस्टीस प्रकल्प इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी अकोला यांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयातील 300 किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसह सावित्रीबाई कन्या शाळा ते अग्रसेन चौक, दीपक चौक पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत बालविवाह, बालहिंसा व बालक अवैध वाहतूक या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला. तर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुलगी वाचवा, देश वाचवा अशा घोषणांनी वातावरण भारुन टाकले.
रॅलीनंतर जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व, बालविवाह, अत्याचार व बालक अवैध वाहतूक,शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अकोल्यात मध्यप्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड येथून कामानिमित्त पालकांसोबत स्थलानंतर कुटुंबातील बालकांच्या शिक्षणाच्या समस्यांवर प्रकाश टाकला. समन्वयक सपना गजभिये यांनी दिवसेंदिवस वाढते बाल अत्याचार, बाल तस्करी, बालके सुरक्षिततेवर मार्गदर्शन केले. या उपक्रमातून बालिकांच्या हक्कांची जाणीव वाढवण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा कार्यक्रमांद्वारे बालविवाह व बालहिंसा प्रतिबंधित करण्यात येतील, असे मत व्यक्त करण्यात आले.
रॅलीत सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका डॉ. फारेहा सुलताना, सर्व शिक्षकांवृंद, चाईल्ड लाईन सदस्य, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन संचालक अशोक बेलेकर यांचे लाभले, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपना गजभिये, विशाल गजभिये, कम्युनिटी सोशल वर्कर राजश्री कीर्तिवार, पूजा मनवर, पूजा पवार, स्वयंसेवक गणेश चितोळे, निखिल चितोळे यांनी परिश्रम घेतले.