अकोला

Akola Mayor Election | अकोला महापालिकेत शरद पवारांच्‍या राष्‍ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, महापौरपदाचा तिढा सुटला

४४ नगरसेवकांची शहर सुधार आघाडी स्‍थापन

पुढारी वृत्तसेवा

अकोला महानगरपालिकेत महापौरपदासाठी ४१ नगरसेवकांची गरज होती. आता भाजप नेतृत्त्‍वाखालील शहर विकास आघाडीने ४४ पर्यंत मजल मारली आहे.

Akola Mayor Election

अकोला : अखेर अकोला महानगरपालिकेच्या सत्ता स्‍थापनेचा तिढा सुटला आहे. मागील काही दिवस सर्वांच्या नजरा लागून असलेल्या सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला असून, शरद पवारांच्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'शहर सुधार आघाडी' नावाचा नवीन गट स्थापन करण्यात आला आहे. यामुळे भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे सत्तेचे दावे फोल ठरले आहेत.

'शहर सुधार आघाडी'चे समीकरण

सत्ता स्थापनेसाठी 'शहर सुधार आघाडी' नावाचा नवीन गट स्थापन करण्यात आला आहे. या आघाडीकडे एकूण ४४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यामध्‍ये भाजपचे ३८, शरद पवारांच्‍या राष्ट्रवादीचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १, शिवसेना (शिंदे गट) १ आणि १ अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे, अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली आहे.

काँग्रेस-वंचितचे दावे फोल

८० जागांच्या अकोला महानगरपालिकेत ३८ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर २१ जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले होते, मात्र मॅजिक फिगर (बहुमत) गाठण्यात त्यांना अपयश आले. पुढारी न्यूजने यापूर्वीच भाजप आणि शरद पवार गटात बोलणी सुरू असल्याचे वृत्त दिले होते. यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. आता आगामी महापौरांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT