Mission Mahagram Extension 2029 Pudhari
अकोला

Mission Mahagram |'मिशन महाग्राम'ला २०२९ पर्यंत मुदतवाढ; ग्राम विकासासाठी प्रत्येक गावाला १० लाखांचा विशेष निधी

मिशन महाग्राम'च्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण शाश्वत विकास

पुढारी वृत्तसेवा

Mission Mahagram Extension 2029

 अकोला : ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करून गावांचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान' (मिशन महाग्राम) या महत्त्वाकांक्षी अभियानाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानांतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावातील विकासात्मक कामांसाठी १० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली असून, यातून रोजगार निर्मिती, कौशल्य विकास व शासकीय योजनांचा स्थानिक पातळीवर लाभ देणे आदी कार्य होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या टप्पा-२ अंतर्गत ‘मिशन महाग्राम’चा कालावधी २०२२–२०२५ असा मंजूर होता; तो आता वर्ष २०२९ पर्यंत वाढविण्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली आहे.

ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला गती देण्यासाठी 'मिशन महाग्राम' राबविण्यात येते. पाणी, आरोग्य, स्वच्छता, पर्यावर, कृषी, कौशल्यविकास आणि डिजिटल् कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांतील विकासाला अभियानातून प्राधान्य दिले जाते.

या अभियानाचा भर हा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह गावातच रोजगार आणि उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर  आहे. या मिशन अंतर्गत कौशल्यविकास कार्यक्रम, कृषी उत्पादकतेत वाढ, महिला बचत गट आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले जातात.

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची अंमलबजावणी शासन, खासगी क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून केली जाते. विविध विकास उपक्रमांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर करण्याची तरतूदही अभियानात आहे. 

निवडलेल्या ग्रामपंचायतीमधील विकासकामांना गती देण्यासाठी समन्वय यंत्रणा कार्यरत असून नियुक्त ग्राम समन्वयकाकडे गावाचा विकास आराखडा तयार करणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधने व कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

स्थानिक गरजांचा विचार करुन गावाचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करणे, उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करणे आणि लोकसहभागातून दीर्घकालीन विकास साधने, हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासोबतच पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, शेती आणि उपजीविकेच्या संधी वाढविण्यावर भर दिला जातो.

स्थानिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर आणि लोकसहभागातून ग्रामीण भागाचे चित्र बदलण्यासाठी 'मिशन महाग्राम' हे एक प्रभावी माध्यम ठरत असून, या मुदतवाढीमुळे अकोल्यासह राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गतिशीलता मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT