अकोला, पुढारी वृत्तसेवा : आयपीएल क्रिकेटवर अकोट शहरातील गुरुकुंज कॉलनी मधील एका घरात सट्टा लावला जात होता. येथे धाड टाकून सट्टा खेळणा-या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व लॅपटॉपसह एकूण ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अकोट शहर पोलिसांनी सोमवारी केली. (Akola Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुकुंज कॉलनीत घरफोडी प्रकरणी पोलीस चौकशी करीत होते. त्यावेळी पोलिसांना ५ जण एका घरात संशयास्पद राहत असल्याचे समजले. या वरुन पोलिसांनी धाड टाकली असता खोलीमध्ये २ जण लॅपटॉपवर व ३ जण मोबाईलवर काम करताना आढळून आले. त्यांच्याकडील लॅपटॉप व मोबाईल ची पंचासमक्ष पोलिसांनी पाहणी केली.
पवन विजय नागापुरे ( वय २६, रा. वडाळा जि. अमरावती), आयुष विनोद वाटाणे (वय १९, रा. आसेगाव, ता. जि. अमरावती) , चेतन हरीभाऊ ढोणे (वय २२, रा. कु-हा, जि. अमरावती), प्रज्वल विनायक कडवे (वय २३, रा. चंद्रमणी चौक, आंबेडकर नगर, वाडी नागपूर) , स्वप्निल संजय कुथे (वय २४, रा. बोरगाव, जि. वर्धा) हे पाच जण ३० मार्च रोजी होणा-या दिल्ली विरूध्द हैद्राबाद या आयपीएल किकेट सामन्यावर लिंक वर गि-हाईकांचे आयडी बनवून सट्टा खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून साहित्य, मोबाईल हॅन्डसेट व लॅपटॉप असा ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.