अकोला, पुढारी वृत्तसेवा : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अल्पवयीन मुलांचे मारहाणीचे प्रकरण पोलिसांत पोहोचले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंस्टाग्रामवर मॅसेज का टाकतो, अशी विचारणा करून मी मॅसेज टाकलेला नाही, असे म्हणणाऱ्या अल्पवयीन मुलासह तिघांना चाकूने जखमी करण्याची घटना गुरूवारी रात्री वाडेगावात घडली. घटनेमधील मुले अल्पवयीन असून एकाच समाजातील आहेत. (Akola Crime News)
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, वाडेगाव येथील उमराव चौक छोटी हद्द चाळ ठिकाणी तीन मित्र बसले होते. बाळापूर येथील एक मुलगा त्या ठिकाणी आला. त्याने माझे इंस्टाग्रामवर मॅसेज का टाकले, असे वाडेगावातील मुलास विचारले असता त्याने मी मॅसेज टाकले नाहीत, असे म्हटले.
यानंतर बाळापूर येथील मुलाने त्याच्या हातातील चाकूने तिघांनाही जखमी केले. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी कलम ११८ (२) बीएसएनएस अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बाळापूर पोलिस करीत आहेत.या घटनेतील जखमींना उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले होते.