

अकोला : चालकाचे : टॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने टॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाला. या ट्रक्टरखाली सापडलेल्या चालकाला पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशची संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री ७ वाजता पिंपळगाव चांभारे ते धाकली रोडवर पिंपळगाव चांभारे नजिक घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, घाकली गावातून सिमेंट खाली करून ट्रॅक्टर धोत्रा शिंदे येथे जात असताना बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे नजिक ट्रॅक्टर ट्राॅलीसह पलटी झाला . या अपघातात ट्रॅक्टरखाली अनुप गणेश बोकणे (वय ३५, रा.धोत्रा, ता.मुर्तीजापुर जि.अकोला) हे दबलेले असल्याची माहिती धाकलीचे सरपंच महेंद्र गाढवे यांनी पिंजर येथील बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना दिली. त्यानंतर दिपक सदाफळे यांनी तातडीने आपले सहकारी मयुर सळेदार, महेश वानखडे, मयुर कळसकार, वैभव सुखचैन, भिमराव सुरळकर, ऋषिकेश अंधारे, दादाराव सुरळकर, अंकुश चांभारे, विठ्ठल अंधारे, मंगेश अंधारे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसिबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर सरळ करुन दबलेल्या चालकास मोठ्या कल्पकतेने बाहेर काढले. त्यानंतर जागेवरच प्रथमोपचार करून त्याला अकोला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.