Leopard Cub Found in Balapur Taluka
Summary
बाळापूर तालुक्यातील कसूरा रोड परिसरात आढळले बिबट्याचे पिल्लू
सिंधी कॅम्प (अकोला) येथे वैद्यकीय तपासणीनंतर पिल्लास निगराणीखाली पिंजऱ्यात ठेवण्यात आले
पिल्लाचा आवाज ऐकून बिबट मादी घटनास्थळी धावून आली
अकोला : अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील कसूरा रोड परिसरात आढळून आलेल्या बिबट्याच्या पिल्लाच्या प्रकरणाला अखेर सुखद कलाटणी मिळाली आहे. वनविभागाने राबवलेल्या शास्त्रशुद्ध व संवेदनशील कार्यवाहीमुळे बिबट मादी स्वतः घटनास्थळी येऊन पिल्लाला घेऊन जंगलात निघून गेली.
17 डिसेंबर रोजी कसुरा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर, अंदाजे 100 मीटर अंतरावर डांबरी रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते. याबाबत सुभाष खेडकर यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. नागरिकाच्या या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. माहिती मिळताच वनपाल जी. पी. गायकवाड व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिल्लास ताब्यात घेतले.
वाहन चालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पिल्लास वनपरीक्षेत्र कार्यालय, सिंधी कॅम्प (अकोला) येथे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर पिल्लास निगराणीखाली पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. दरम्यान, बिबट मादीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसरात सातत्याने पाहणी व निरीक्षण सुरू ठेवले.
अखेर संबंधित ठिकाणी हालचाल दिसून आल्यानंतर, नियोजनबद्ध पद्धतीने पिल्लास त्या ठिकाणी सोडण्यात आले. काही वेळातच पिल्लाचा आवाज ऐकून बिबट मादी घटनास्थळी आली व पिल्लाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेली. वनविभागाच्या या कार्यवाहीमुळे वन्यजीव संरक्षणासोबतच मानवी-वन्यजीव संघर्ष टळला असून नागरिकांकडून वनविभागाच्या कार्याचे कौतुक होत आहे.