

मारूल हवेली : पाटण तालुक्यातील बहुले येथे बुधवारी सकाळी उसाच्या शेतात तोडणी मजुरांना बिबट्याची चार पिल्ले ( बछडे ) आढळून आली. बिबट्याचे बछडे आढळल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.
बहुले येथील करकट नावाच्या शिवारात उसाची तोडणी सुरु असताना ही पिल्ले आढळून आली. मजूर ऊस तोडणी करीत असताना त्यांना अचानक मांजरीच्या पिल्लांसारखा आवाज आला. त्यांनी पुढे जावून पाहिले असता मांजरीऐवजी बिबट्याची चार पिल्ले त्यांना दिसली. त्यामुळे तोडणी कामगार घाबरुन गेले. त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. बिबट्याची पिल्ले नुकतीच जन्मली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिबट्यांची पिल्ले पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु असल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.