विदर्भ

अकोला : शालेय पोषण आहार योजना वर्षभर बंद; अंबादास दानवेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अविनाश सुतार

अकोला: पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षभरापासून अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजना बंद असल्याची धक्कादायक माहिती अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत समोर आली. एक प्रकारे या योजनेकडे जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्याच्या दौ-यावर असताना विरोधी पक्षनेते दानवे त्यांनी जिल्ह्यातील शेतक-यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, पीक विमा मदत, शेतकऱ्यांना स्वस्त धान्य रेशन योजना, कुपोषित बालक व शालेय पोषण आहार तसेच जिल्ह्यातील समस्यांबाबत दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. लहान मुलांच्या हक्काची असलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना न देऊन एकप्रकारे त्यांच्या भवितव्य व भविष्याशी खेळ करत आहात असे म्हणत दानवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकारावरून अधिकाऱ्यांची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे दानवे म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय गळतीचे प्रमाण वाढेल, अशी भीतीही दानवे यांनी व्यक्त केली.

राज्यात कोणाची सत्ता असली तरी कुपोषण हा विषय कायम आहे. प्रगतशील महाराष्ट्रात भुकेने मृत्यू होणे, ही दुर्देवी गोष्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याविरोधात आवाज उठवून हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, तहसिलदार सुनिल पाटील, अकोला ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी राहुल कराळे, एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर तसेच सर्व संबंधित विभागाचे मुख्य अधिकारी व शिवसेनेचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे – फडणवीस सरकार हे धनदांडग्यांचे सरकार

शेतक-यांना मदतीसाठी कोट्यवधी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकार करते, मात्र प्रत्यक्षात शेतक-यांच्या खात्यात एक रुपयाही मदत पोहोचत नाही. शिंदे फडणवीस सरकार हे धनदांडग्याचे सरकार व गुजरातला मदत करणारे सरकार असल्याचा आरोप दानवे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या योजना बंद करून जनतेचा विकास खुंटवण्याचं काम करत असून हे स्थगिती सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली.

सत्तार ही विकृती

मंत्री अब्दुल सत्तार ही विकृती असून कुठे जातील तिथे तसेच वागणार अशी प्रतिक्रिया दानवे यांनी शिंदे गटाच्या बैठकीत झालेल्या सत्तार यांच्या वादावर केली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT