अकोला; पुढारी वृत्तसेवा : देशात आढळणाऱ्या सापांच्या प्रजातींपैकी १२ प्रजाती ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामधे इंडियन एग ईटर म्हणजेच भारतीय अंडी खाऊ सापाचाही समावेश होतो. इंडियन एग ईटर हा अतिशय दुर्मिळ असलेला साप अकोला तालुक्यातील खरप बु गावात आढळला. या सापाला सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले.
रविवारी खरप बु रहिवाशी कुणाल देशमुख यांच्या अंगणात साप दिसला. त्यांनी त्वरीत याची माहिती सर्पमित्रांना दिली. यानंतर सर्पमित्र हेमंत देशमुख व त्याचे सहकारी विवेक पागृत, कुमार सदाशिव, सुरज इंगळे, दीपक पाटील खरप बु येथे पोहचले. दोन फूट लांब व अत्यंत दुर्मिळ जातीचा 'भारतीय अंडी खाऊ साप' असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.
निमविषारी काळसर तपकिरी रंगाच्या या सापाला डिवचल्यावर तोंड उघडे ठेवून हल्ला करतो. झाडावर सहज चढणाऱ्या या सापाच्या पाठीवर तोंडापासून ते शेपटी पर्यंत पांढरी रेषा असते. शरीर चपटे व त्रिकोणाकार असते. याचे वैशिष्ट नावाप्रमाणेच असून सुरूवातीच्या मणक्याखालील भाग पात्यासारखा असतो. अन्ननलिकेत अंडे गिळत असताना पात्यामुळे अंडे फुटून द्रवपदार्थ आत जातो तर कवच बाहेर टाकले जाते. तो पाली, सरडे, पक्षी यांची अंडी खातो, यावरून अंडीखाऊ साप म्हणून त्याला ओळखले जाते.
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मधील भाग २ मध्ये साप समाविष्ट आहे. हा साप नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सर्पमित्रांनी त्याला जीवदान दिले. आपल्या परिसरातील कुठेही साप आढळून आल्यास सर्पमित्रांना संपर्क करावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
हेही वाचा :