विदर्भ

भंडारा: अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोषीला २० वर्षांचा कारावास

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली. राजेंद्र लक्ष्मीचंद धुर्वे (वय २९, रा. गुडरी, ता. तुमसर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
यातील पीडित मुलीच्या वडिलांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिची आई मजुरीचे काम करते. अल्पवयीन मुलगी दहाव्या वर्गात नापास झाल्याने ती घरीच राहत होती. तिच्या घरी टीव्ही नसल्याने ती आपल्या बहिणीसोबत नात्याने भाऊ लागत असलेल्या राजेंद्र धुर्वे याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात होती.

दरम्यान, मार्च २०१८ मध्ये पीडित मुलीची अचानक प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने विचारणा केली असता तिच्या नात्यात भाऊ लागत असलेल्या आरोपी राजेंद्र याने तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपीला विचारणा केली असता त्याने पीडितेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ३० सप्टेंबर २०१८ रोजी पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेव्ही ती आठ महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर आरोपी राजेंद्र धुर्वे याला लग्नाबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत लग्न करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेच्या आईने गोबरवाही पोलिसांत तक्रार दाखल केली. गोबरवाही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. तपासाअंती आरोपपत्र विशेष सत्र न्यायालयात दाखल केले. पुराव्यांच्या आधारे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.बी. तिजारे यांनी आरोपी राजेंद्र धुर्वे याला दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजारांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून अल्पवयीन पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. गोबरवाही पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार तिलक दिघोरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT