File Photo  
विदर्भ

गडचिरोलीत ८ आत्‍मसमर्पित नक्षलवाद्यांसह १२७ आदिवासी जोडपी होणार विवाहबद्ध

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखा आणि गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्‍या, 26 मार्च रोजी गडचिरोलीत अभिनव लॉन येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आत्मसमर्पण केलेल्या 8 नक्षलवाद्यांसह 127 आदिवासी युवक-युवती विवाहबद्ध होणार आहेत.

मैत्री परिवार संस्थेतर्फे 2018 साली पहिल्‍यांदा सामूहिक विवाह सोहळा घेण्‍यात आला. याआधी, नागपूर व अहेरी येथे प्रत्‍येक एक व गडचिरोली येथे दोन सामूहिक विवाह सोहळे घेण्‍यात आले. आतापर्यंत 15 आत्‍मसमर्पित नक्षल जोडप्‍यांसह एकुण 433 आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले.

8 आत्मसर्पित नक्षलवादी मुख्य आकर्षण 

या सामूहिक विवाह सोहळ्यात एकुण 127 आदिवासी युवक-युवतींचे विवाह होणार असून पोलिसांसमोर आत्‍मसमर्पण केलेल्‍या 8 नक्षलवादी जोडप्‍यांचे विवाह हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. 3500 लोकांची बसण्याची क्षमता असलेला भव्य डोम उभारण्‍यात येत आहे. गडचिरोली जिल्‍ह्यातील विविध भागातून आलेल्‍या या उपवर-वधूंची 10 झोनमध्‍ये विभागणी करण्‍यात आली आहे. यात उपवर-वधू आणि त्‍यांच्‍या नातेवाईकांची बसण्याची व्यवस्था राहील. आत्‍मसमर्पित नक्षलवादी उपवर-वधूंसाठी 'नवजीवन' हा स्वतंत्र झोन तयार करण्यात आला आहे.

विवाहस्थळी चार वेगवेगळ्या आकाराचे मंडप उभारले जात आहेत. प्रत्येक मंडपाला आदिवासी जमातीतील दैवत व शूरविर पुरुषांची नावे देण्यात येणार आहेत. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा यांचे नाव तर आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आणि मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नारायण सिंह यांचे नाव देण्यात येणार आहे. वधू-वरांच्या भोजन कक्षाला वीर राणी दुर्गावती यांचे नाव देण्‍यात येईल.

या सामूहिक विवाह सोहळ्याची वैशिष्ट्ये म्हणजे आदिवासी परंपरेनुसार सोहळा पार पडेल. नवदाम्पत्याच्या माता-पित्‍यांना आहेर भेटवस्तू,नवदाम्पत्यासह त्यांच्या ११ नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था वधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि सांसारिक साहित्य, नवदाम्पत्यांशी वर्षभर संपर्कात राहून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न,नवविवाहित जोडप्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्‍यात येणार आहे.

.हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT