ठाणे

डॉ. भाऊसाहेब दांगडे कल्याण डोंबिवलीचे नवे आयुक्त

अमृता चौगुले

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

कोविड काळात २७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. सर्व सहकारी अधिकाऱ्यांना विश्वासात घेत; ग्रामीण भागात कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी नियोजनपूर्वक काम केले. ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांचे लाभ मिळावेत यासाठी ते नेहेमीच प्रयत्नशील राहिले. तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सेवेतील लाभ मिळावेत यासाठी ते आग्रही होते.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषि, पशुसंवर्धन, आरोग्य , यांत्रिकी, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल विकास, समाजकल्याण, ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, नरेगा, ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बांधकाम, सामान्य प्रशासन, वित्त, शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक, राष्ट्रीय आरोग्य अभियान आदी सर्व विभागातील शासनाच्या सर्व योजना, उपक्रम, अभियान, मोहिमा गतिमान करतानाच जिल्हा परिषदेच्या सेसमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांचा भर राहीला. कामाचे उत्तम नियोजन, उत्कृष्ट आयोजनामुळे शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांना त्यांच्या काळात गती मिळाली आणि जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर मोहोर उमटवली.

यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजनेचा उल्लेख करता येईल. त्याचबरोबर जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन या योजनेच्या कामांमध्येही गतिमानता आण्णायस त्यांना यश मिळाले. ऐन कोविड काळात देखील शासनाच्या नियमांचे पालन करत, मागील अनेक वर्षांपासून रखडलेली अनुकंपा भरती प्रक्रिया राबवून पात्र अनुकंपाधारकांना सेवेत समाविष्ट करून घेतले. तर जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्या, आश्वासीत प्रगती योजना, आणि अनुषंगाने इतर लाभही कर्मचाऱ्यांना त्यांच्या काळात मिळाले.

जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्याबरोबरच, जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी बाळंतविडा, पोषकवडी, बेबी केअर किट ल, झोळी मुक्त अभियान आदी उपक्रम राबविण्यावर त्यांचा भर राहिला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावतानाच विद्यार्थीप्रिय शालेय वातावरण निर्माण करण्यासाठी दप्तरालय योजना, ग्रंथालय योजना, विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तकं, लायब्रोटरी, कला-क्रीडा साहित्य,आदी योजना त्यांच्या काळात राबविण्यात आल्या.

विशेष म्हणजे कोविड काळातील मुलांच्या भाषा आणि गणित विषयामधे वृद्धी होण्यासाठी उमंग हा नाविन्यपूर्ण अभियान राबविण्यात आला. ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातूनही नागरी आणि जन सुविधा योजना राबवून गावं आणि ग्रामपंचायतमधे सोई आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी यांचा कटाक्ष असायचा. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा पुरविण्याकडे त्यांचा कल असायचा.

मागील दोन वर्ष कोविड काळात गेली असली तरी डॉ. दांगडे यांनी जिल्हा परिषदेचा आर्थिकतोल ढळू दिला नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांनी उत्तम समन्वय साधला. शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आणि जिल्हा परिषद सेसच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT