ठाणे

ठाणे जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत जमावबंदी लागू

Shambhuraj Pachindre

ठाणे : पुढारी वृत्तसेवा राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेना विरुद्ध मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटामधील संभाव्य संघर्षाची शक्यता आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सोमवारपासून 23 जुलैपर्यंत ठाणे, कल्याण, डोंबविली, उल्हासनगर, भिंवडी, बदलापूर, अंबरनाथ, मीरा भाईंदर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोक जमा होणे, जाहीर सभा घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी काढले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील असल्याने त्याचा परिणाम अधिक जाणवत आहे. ठाण्यातील पाच आमदार आणि सुमारे 120 माजी नगरसेवक हे शिंदे गटाकडे गेले आहेत. यामुळे आगामी काळात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलीस सतर्क झाले आहेत.

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी कृत्यांना मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेर्‍या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका. सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, आदींना हे आदेश लागू राहणार नाहीत. याचे भंग केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT