कसारा; पुढारी वृत्तसेवा : अचानक आलेला जोरदार वारा व वादळ यामुळे आज (दि.१७) शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील दहिवली येथील शेतकरी रमेश दुभेले यांच्या पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दहिवली येथील स्थानिक शेतकरी असलेले दुभेले यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपल्याच शेतात पोल्ट्री फार्म बांधला ४ हजारच्या आसपास कोंबड्या बसतील एवढ्या क्षमतेचे असलेल्या पोल्ट्रीमध्ये ३ हजार ५०० पिल्ली व मोठ्या कोंबड्या होत्या.
आज दुपारी अचानक सोसाट्याचा वारा व वादळ आले त्यात अनेक लहान मोठी झाडे उन्मळून तर पडलीच परंतु हे वादळ पोल्ट्रीच्या शेडमध्ये घुसल्याने संपूर्ण पोल्ट्रीच उडवस्थ झाली. पोल्ट्रीचे पत्रे, खांब उन्माळून पडले पूर्ण शेड खाली कोसळले.
यामुळे यातील शेकडो पिल्ली आणि कोंबड्या दगावली असून या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी महसूल कर्मचाऱ्यांना घटनास्थली पाठवून पंचनामा करुन घेतला.
दरम्यान या ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी न आल्याने मयत पिल्ली व कोंबड्यांची नेमका आकडा समजू शकला नाही. अचानक पणे वादळ येऊन मोठे नुकसान झाल्याने शेतकरी रमेश रमेश दुभेले पूर्णता खचून गेले आहेत. पीडित शेतकरी दुभेले यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.