ठाणे : आजच्या स्पर्धेच्या आणि जागतिकीकरणाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आंतरराष्ट्रीय संवादकौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. विविध देशांची भाषा, संस्कृती आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी परदेशी भाषांचे ज्ञान हे अनिवार्य ठरत आहे. हाच मुद्दा लक्षात घेत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कान्होर इंदगाव केंद्र येथील जिल्हा परिषद शाळेने याच गरजेला अनुसरून एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.
लेट्स कनेक्ट द वर्ल्ड थ्रू जर्मन लँग्वेज असे या उपक्रमाचे नाव असून, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे दिले जात आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये सामान्यतः परदेशी भाषा शिकविल्या जात नाहीत, मात्र या शाळेने त्या चौकटीतून बाहेर पडून विद्यार्थ्यांसाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद साधता येण्यासाठी, तसेच विविध संस्कृतींची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शाळेचे मुख्यध्यापक अमोल पेन्सलवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच जर्मन भाषेतही संवाद साधू लागले आहेत.
सुरुवातीला विद्यार्थ्यांना जर्मन भाषेतील मूलभूत शब्दांची ओळख करून दिली जाते आणि त्यानंतर छोटे संवाद, वाक्यरचना शिकवली जाते. पालकांच्याही उत्स्फूर्त प्रतिसादाने या उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांसाठी अधोरेखित झाले आहे.
अनेक विद्यार्थी हे घरी देखील जर्मन भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ भाषा शिक्षणापुरतेच मर्यादित नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दृष्टिकोन निर्माण करणे, सांस्कृतिक आदान-प्रदानाची संधी निर्माण करणे आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हेही त्यामागील उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाला 'दिशा' या जिल्हा परिषदेच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शैक्षणिक प्रकल्पाची साथ लाभली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या पुढाकारामधून सुरू झालेल्या दिशा प्रकल्पामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तात्मक शिक्षणातून सक्षम बनवले जात आहे. असे मुख्याध्यापक अमोल पेन्सलवार यांनी सांगितले.